पुणे : पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांत गुरुवारी सकाळी धूर येऊ लागला. तातडीने गाडी थांबवून दुरुस्ती करण्यात आल्याने दुर्घटना टळली. ठाकूरवाडी स्थानकानजीक ही घटना घडली.

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस आज सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी पुण्यातून मुंबईकडे रवाना झाली. लोणावळ्यात थांबा घेतल्यानंतर गाडी पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर मंकी हिलला तांत्रिक थांबा घेतल्यानंतर गाडी कर्जतकडे मार्गस्थ झाली. त्यावेळी गाडीच्या सी १ आणि सी २ या वातानुकूलित डब्यांतून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. ठाकूरवाडी स्थानकावर गाडी तातडीने थांबवण्यात आली. ठाकूरवाडी स्थानकावर दुरुस्ती करून दहा मिनिटांनी गाडी पुढे सोडण्यात आली. यामुळे अखेर गाडी २५ मिनिटे विलंबाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचली.

हेही वाचा – पुणे : कोरेगाव पार्क, मगरपट्टा ‘उष्णतेचे नागरी बेट’? हवामान विभागाकडून अभ्यासाचे नियोजन

वातानुकूलित डब्यांतील समस्या दूर करण्यात आली तरीही गाडीच्या वातानुकूलित डब्यांच्या दोनी बाजूने धूर निघत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. दरम्यान, याआधी गाडीच्या डब्यांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात गाडीच्या महिला डब्याला आग लागली होती. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती.

हेही वाचा – मनसेचे वसंत मोरे म्हणाले, “हिरव्यागार पुण्याला भकास करत असल्यास..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेक्कन क्वीनच्या ब्रेक पॅडमध्ये समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे त्यातून धूर निघत होता. तातडीने दुरुस्ती करून गाडी पुढे पाठवण्यात आली. गाडीला यामुळे अंतिम स्थानकावर पोहोचण्यास २५ मिनिटे विलंब झाला, असे मुंबई, मध्ये रेल्वे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, शिवाजी सुतार म्हणाले.