पुणे : केंद्रीय महिला आणि बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी पाहुणे असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. इराणी यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘जय श्रीराम’ या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बाल्कनीमधून ‘महात्मा गांधी की जय’ या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी दिल्या. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ व्यत्यय आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां वैशाली नगवडे यांच्यासह पाच महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आल्याची तक्रार राष्ट्रवादीने केली आहे. तर रंगमंदिराच्या परिसरात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिरातील कार्यक्रमापूर्वी स्मृती इराणी यांचा सेनापती बापट रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. त्यापूर्वी महागाईच्या मुद्दय़ावर इराणी यांनी बोलावे, अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली  निदर्शने करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani faces protests by congress ncp over price rise during pune visit zws
First published on: 17-05-2022 at 03:03 IST