कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक व पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मुलास मारहाण व शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी या चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. मंगळवारी रात्री बाणेर भागामध्ये ही घटना घडली.
अंकुर अभय बोरवणकर (रा. बाणेर रस्ता) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डिक्याराम रामल्लू मेघावत (वय ५५, रा. लमाण तांडा), बच्चन वाच्या धनावत (वय १९), मोटय़ा रामला मेघावत (वय ३०), व किशोर लच्छा रामावत (वय १९, सर्व रा. संजय गांधी वसाहत तांडा) यांच्या विरुद्ध चतुश्रृंगी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुर हे त्यांच्या भावासह मोटारसायकलवरून मित्राला भेटण्यासाठी निघाले होते. त्यांच्या पाठीमागून येत असलेल्या स्कॉर्पिओ मोटारीने त्यांच्या मोटारसायकलला ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामध्ये मोटारीतील चौघांचा अंकुर व त्यांच्या भावाशी वाद झाला. त्यातून दोघांना हाताने व दगडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपींवर जमाव जमा करून शिवीगाळ व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2013 रोजी प्रकाशित
मीरा बोरवणकर यांच्या मुलास मारहाण; चौघांना अटक
कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक व पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मुलास मारहाण व शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
First published on: 28-03-2013 at 01:27 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son of meera borwankar has been beaten up by four people