पुणे : पुण्यातील वडगाव ब्रीज जवळ भरधाव मर्सिडीज कारने आज पहाटेच्या सुमारास दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी मर्सिडीज कारमधील चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुणाल मनोज हुशार या दुचाकी चालकाचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे.तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी कार चालक शुभम राजेंद्र भोसले वय 27,निखिल मिलिंद रानावडे वय 26 रा औंध गाव, श्रेयस रामकृष्ण सोळंखी वय 25 रा चिंचवड, वेदांत इंद्र सिंग राजपूत वय 28, रा निगडी,या चार आरोपींची नाव आहेत.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार,सातारा रोडवरून आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने MH 01 BK 4625 या क्रमांकाच्या मर्सिडीज कारमधून निखिल मिलिंद रानावडे,श्रेयस रामकृष्ण सोळंखी,वेदांत इंद्र सिंग राजपूत आणि शुभम राजेंद्र भोसले हे चौघेजण जात होते.वडगाव ब्रीज येथून मर्सिडीज भरधाव जात असताना, त्याच रस्त्यावरून प्रज्योत दीपक पुजारी आणि कुणाल मनोज हुशार हे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मर्सिडीज कारने दुचाकीला जोरात धडक दिली.त्या घटनेत कुणाल हुशार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.तर त्याचा मित्र प्रज्योत पुजारी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर या दुचाकीला मर्सिडीज कारने धडक दिल्यानंतर ती कार सर्विस रोड क्रॉस करून पुढे गेली आणि फुटपाथवर जाऊन कार आदळली. त्या कारमधील चौघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर या सर्वावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.