पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे स्थान घसरण्यामागे प्राध्यापकांच्या रिक्त जागा हे प्रमुख कारण असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रमवारीतील घसरणीचे खापर सोमवारी विद्यापीठाच्या प्रतिमेवर फोडून विद्यापीठाला प्रतिमा उंचावण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी, प्राध्यापकांची संख्या कमी असल्याचे मान्य करून राज्याच्या काही आर्थिक, तसेच नियमांतील अडचणी असल्याचीही कबुली त्यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६व्या पदवी प्रदान कार्यक्रमात पाटील बोलत होते. ‘नॅक’च्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे, सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.
पाटील म्हणाले, ‘जागतिक स्तरावर विद्यापीठाची क्रमवारी उंचावली, देशपातळीवर खाली गेली. दोन्हीकडे मूल्यांकनाचे निकष वेगळे आहेत. समाजमाध्यमांतून मानांकन वाढल्याचे कौतुक नाही, पण मानांकन खाली आल्यावर शोधून शोधून टीका केली जाते. हा समाजमाध्यमाचा स्वभाव आहे. पण, निंदकाचे घर असावे शेजारी. आपल्याकडे काय कमी आहे, हे आपल्यालाही कळते.’
‘राज्याच्या काही आर्थिक आणि नियमांतील अडचणी आहेत. १११ प्राध्यापकांच्या भरतीला मान्यता मिळून दीड वर्ष झाले, पण नियमांच्या अडचणी आल्या आहेत. महाविद्यालयांतील प्राध्यापकांबाबत राज्याच्या आर्थिक अडचणी आहेत. सगळ्यावर मात करून महिनाभरात ते सगळे मार्गी लागेल. पण, मानांकनासाठी तेवढा एकच निकष असतो का? क्रमवारीबाबत मुख्यमंत्रीही चिंतेत पडले. त्यामुळे याबाबत बरीच चर्चा केली, तेव्हा यात वेगवेगळे वीस निकष असल्याचे दिसते. त्यातील एक आहे विद्यापीठाची प्रतिमा. मीही विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. विद्यार्थी, प्रश्न, आंदोलन या विरोधात मी नाही. पण, आंदोलनांचे स्वरूप कसे असावे, समन्वयाने प्रश्न सोडवता येतील का, याचा विद्यापीठानेही प्रयत्न करावा,’ असा सल्ला त्यांनी दिला.
पाटील म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कधी आंदोलने झालीच नाहीत. कारण, रयतेला काय हवे आहे हे त्यांना आधीच कळायचे. तसेच, समाजमाध्यमातून देशभर, जगभर काय संदेश जातो याचाही विचार केला पाहिजे. या विद्यापीठात सतत आंदोलनेच होत आहेत, तर देशातील विद्यार्थी कशाला येतील? विदेशातील विद्यार्थी आपल्याकडे येण्यासाठी या वर्षी आपण एक संस्था नियुक्त केली. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला आहे. परदेशातून विद्यार्थी आल्यानंतर ते टिकायलाही हवेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढली पाहिजे. तसेच, प्राध्यापक भरती, निधी देणे, सीएसआर मिळवणे यासाठी मदत करण्यात येईल. डॉ. गोसावी यांनी विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा, कामगिरीचा आढावा घेतला.