पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत हातात ध्वज घेतलेल्या व्यक्तींच्या विश्वविक्रमासह ७५ विविध उपक्रम करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (९ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे.

अभियानाविषयी आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजित फडण‌वीस, डॉ. महेश अबाळे, डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आदी उपस्थित होते. राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या सर्वाधिक व्यक्तींच्या छायाचित्रांचा विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत किमान दीड लाख छायाचित्रांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पांडे म्हणाले, की राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या व्यक्तींचा अद्याप विश्वविक्रम नोंदवलेला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच हा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पुणे महापालिकेकडून ५५ हजार ध्वज उपलब्ध झाले आहेत. प्रत्येकी शंभर या प्रमाणे महाविद्यालयांना राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात येईल. उपक्रमात सहभागी होण्यासाठी राष्ट्रध्वज दोन्ही हातात छातीसमोर पकडून छायाचित्र https://spputiranga.in/photoupload या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहे. सेल्फी स्वरुपातील छायाचित्र ग्राह्य धरले जाणार नाही. छायाचित्र काढताना मागे स्वच्छ भिंत किंवा पडदा असावा.

युवा संकल्प अभियानात रोजगार मेळावा, नवउद्यमी महोत्सव, शोधनिबंध लेखन असे विविध प्रकारचे ७५ उपक्रम राबवले जातील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाला सुमारे दोन हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४५ जणांच्या चमूकडून छायाचित्रांची पडताळणी
विश्वविक्रमाच्या उपक्रमात संकेतस्थळावर अपलोड होणाऱ्या छायाचित्रांची निकषांनुसार पडताळणी करण्यासाठी विद्यापीठाकडून ४५ जणांचा चमू काम करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही पडताळणी करण्यात येईल.