लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नभांगणामध्ये आता लवकरच प्रतिभावंत कथालेखक जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा दिसणार आहे. आकाशातील ताऱ्याचे जीए असे नामकरण करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्णत्वास गेली असून, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज ताऱ्याप्रमाणेच जी. ए. कुलकर्णी यांच्या नावाचा तारा आकाशामध्ये चमकणार आहे. हा तारा आकाशात कायमस्वरूपी चमकत असला, तरी पुण्याच्या क्षितिजावर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दररोज रात्री आठ ते नऊ या वेळात तेजस्वीपणे दिसणार आहे.
आकाशातील ताऱ्याचे जी. ए. कुलकर्णी असे नामकरण करण्यासाठी ‘हंस प्रकाशन’च्या हेमा अंतरकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व सोपस्कारांची माहिती देत अंतरकर यांनी यासंबंधीचे जर्मनीच्या ‘स्टार रजिस्ट्रेशन’ या संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर यांच्याकडे सुपूर्त केले. या प्रमाणपत्रावर ‘फॉर ॲन आउट ऑफ दिस वर्ल्ड रायटर ॲन आउट ऑफ धिस वर्ल्ड ऑफरिंग – विथ लव्ह फ्रॉम हंस प्रकाशन’ असे या प्रमाणपत्रावर नमूद करण्यात आले आहे. ताऱ्याचा शोध घेण्याच्या कामी अंतरकर यांना हौशी खगोल निरीक्षक मितेश पुणतांबेकर यांचे सहकार्य लाभले.
आणखी वाचा-पुणे विमानतळाबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा
अंतरकर म्हणाल्या, की १० जुलै २०२३ रोजी जीएंचा १०१ वा जन्मदिन होता. त्या निमित्ताने ही संकल्पना सुचली असली, तरी त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी लागला. जी. ए. कुलकर्णी हा तारा ध्रुवताऱ्याप्रमाणेच अढळ आहे. ध्रुवताऱ्याजवळ ध्रुवमत्स्य किंवा ऊर्सा मायनर या नक्षत्रामधील तो एक तेजस्वी तारा आहे. पुण्याच्या क्षितिजावर उत्तर दिशेला १० जुलै रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान नुसत्या डोळ्यांनीही तारा दिसू शकेल. जी. ए. कुलकर्णी तारा हा जीएंच्या प्रतिभेची साक्ष देत हजारो वर्षे आकाशात चमकत राहील. हीच त्यांच्याबद्दल लक्षावधी रसिकांना वाटणारी कृतज्ञता आहे.
आणखी वाचा-अजितदादांचा आमदार असलेल्या पिंपरीवर भाजपचा डोळा? घेतला ‘हा’ निर्णय
असा आहे जी. ए. कुलकर्णी तारा
- सूर्यापासून सुमारे १०० प्रकाश वर्षे दूर अंतरावर हा तारा आहे.
- ताऱ्याचा आकार सूर्यापेक्षा दुप्पट आहे.
- सूर्यापेक्षा १ पूर्णांक ३५ शतांश वजन अधिक आहे.
- ताऱ्याचे वय सुमारे १ अब्ज वर्षे आहे.
- नुसत्या डोळ्यांनी पाहता येऊ शकेल.
- ढगाळ, पावसाळी हवामानात दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल.
- सॉफ्टवेअरच्या मदतीने ताऱ्याची अवकाशात स्थाननिश्चिती करू शकतो.