पुणे : ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य असणार आहे.

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ या देशाच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीदरम्यान राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘संपूर्ण वंदे मातरम्’च्या सर्व कडव्यांचे गायन होण्याबाबत, तसेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शिक्षण विभागाने या पूर्वीच सूचना दिल्या आहेत. त्या शिवाय आता सर्व शासकीय कार्यालयांमध्येही वंदे मातरम् गीताची १५०वी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे..

शासनाच्या निर्देशानुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम’ या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी ‘वंदे मातरम’ गीताच्या सामूहिक गान कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार सर्वसाधारण, पुणे यांनी केले आहे. देशभक्तीची भावना दृढ करणे आणि ‘वंदे मातरम’ या राष्ट्रगीतास १५० व्या वर्षानिमित्त अभिवादन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. त्यामुळे जिल्ह्यात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

‘वंदे मातरम्’ गीताला वंदन

  • ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होणार.
  • ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या सर्व कडव्यांचे गायन.
  • ‘वंदे मातरम्’ या गीताचा इतिहास सांगणारे प्रदर्शन शाळांच्या दर्शनी भागात लावण्याबाबत शिक्षण विभागाच्या सूचना.
  • कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शासनाच्या सर्व विभागांतील शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक.
  • ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त सर्व तालुक्यांच्या ठिकाणी सामूहिक गान कार्यक्रमाचे आयोजन