राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही – आनंद तेलतुंबडे

न्यायालयाने आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर ठरवून पुणे पोलिसांना जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशामुळे आनंद तेलतुंबडे यांची लगेच सुटका करावी लागली.

न्यायालयाने आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर ठरवून पुणे पोलिसांना जोरदार चपराक लगावली. न्यायालयाच्या आदेशामुळे पुणे पोलिसांना आनंद तेलतुंबडे यांची लगेच सुटका करावी लागली. सुटकेनंतर माध्यमांशी बोलताना तेलतुंबडे यांनी कालपासून मला खूप शारीरिक त्रास सहन करावा लागला. न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. राज्य सरकारकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही असे सांगितले.

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी मला ताब्यात घेतले आणि काही काळ थांबून ठेवले. मला अमेरिकन विद्यापीठाने पॅरिसमध्ये बोलावले होते. त्या परिषदेचा आणि माओवाद्यांचा काही संबंध नाही. त्यामुळे मला लवकरच न्याय मिळेल. मी गेली 38 वर्ष मिलिंदला भेटलेलो नाही असे त्यांनी सांगितले.

एल्गार परिषदेच्या आयोजनात डॉ. तेलतुंबडे यांचा संबंध असल्याचा संशय तपासयंत्रणेला आहे. पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रथम माहिती अहवालात (एफआयआर) डॉ.तेलतुंबडे यांचे नाव आहे. एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव येथे हिंसाचार येथे झाला होता. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाच्या तपासात नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याप्रकरणी पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर कारवाई केली होती. पोलिसांच्या कारवाईविरोधात तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

शुक्रवारी पुण्यातील विशेष न्यायाधीश के. डी. वढणे यांनी तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आनंद तेलतुंबडे यांना पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे मुंबईतून अटक केली होती. शनिवारी दुपारी तेलतुंबडे यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने या कारवाईवरुन पोलिसांना फटकारले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: State govt have no evidance against me anand teltumbd