पुणे : शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात श्वानाने चावा घेतल्याच्या दररोज सुमारे ८० घटना घडत आहेत. सकाळी फिरायला जाणारे, रात्रीच्या वेळी कामावरून घरी परतणारे आणि लहान मुले यांच्यावर प्रामुख्याने श्वान हल्ला करीत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने श्वानांची नसबंदी करण्याच्या मोहिमेला गती दिली आहे.महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर आणि समाविष्ट गावांत मिळून सुमारे अडीच लाखांहून अधिक श्वान आहेत. यात पाळीव श्वानांबरोबरच भटक्या श्वानांचा समावेश आहे. शहरात जानेवारी ते मे या कालावधीत श्वानांनी चावा घेतल्याच्या १२ हजार ३१२ घटना घडल्या आहेत. त्यात जानेवारीत २ हजार ७९२, फेब्रुवारीत २ हजार ३०९, मार्चमध्ये २ हजार ३५९, एप्रिलमध्ये २ हजार ५०८ आणि मे महिन्यात २ हजार ३४४ घटना घडल्या आहेत. शहरात श्वानांनी चावा घेतल्याच्या दररोज सुमारे ७० ते ८० घटना घडत आहेत.
शहरातील श्वानांची संख्या नियंत्रणात राहावी, यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने त्यांची नसबंदी केली जाते. आरोग्य विभागाने एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एकूण ५६ हजार ५३७ श्वानांची नसबंदी केली. त्यानंतर या वर्षी एप्रिल महिन्यात ४ हजार ८२४ आणि मे महिन्यात ४ हजार ८३९ श्वानांची नसबंदी करण्यात आली. शहरात दरमहा सरासरी साडेचार हजार श्वानांची नसबंदी केली जाते. नसबंदी करतानाच या श्वानांना रेबीजची लस दिली जाते. यामुळे या श्वानांनी चावा घेतल्यास त्यापासून रेबीजचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
घटना एक :
शहरात श्वानांनी लहान मुलांवर हल्ला केल्याचा घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आंबेगाव पठार येथे पाच वर्षांच्या मुलांवर श्वानांनी हल्ला केला होता. हा मुलगा घराच्या खाली खेळत होता. त्या वेळी तीन ते चार श्वानांनी त्याच्यावर हल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी या मुलावरील उपचारांच्या खर्चाची रक्कम आरोग्य विभागाच्या वतीने त्या कुटुंबीयांना दिली होती.
घटना दोन :
मॉडेल कॉलनीत या वर्षी एप्रिल महिन्यात सात वर्षांच्या मुलावर श्वानांनी हल्ला केला होता. हा मुलगा चित्तरंजन वाटिका उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. तेथील भटक्या श्वानांवर त्याने प्रेमाने हात फिरवला असता, त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यात मुलाच्या जबड्याला गंभीर जखम झाली होती. त्याच्यावरील उपचाराचा खर्च मोठा असल्याने अखेर दानशूर व्यक्ती पुढे आले. त्यामुळे या मुलावर प्लॅस्टिक शस्त्रक्रिया करण्यात आली.
श्वानांनी घेतलेले चावे
जानेवारी – २७९२
फेब्रुवारी – २३०९
मार्च – २३५९
एप्रिल – २५०८
मे – २३४४
श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना या केवळ भटक्या श्वानांमुळे घडलेल्या नसून, पाळीव श्वानांमुळेही घडल्या आहेत. याचबरोबर नागरिकांमध्येही रेबीजबाबत जागरूकता निर्माण झाल्याने श्वानाचे नख लागल्यासही त्याची नोंद आरोग्य विभागाकडे होत आहे. श्वानांनी चावा घेण्य़ाच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीच्या मोहिमेला गती देण्यात येत आहे. डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका