scorecardresearch

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जमवले १८ लाख रुपये! विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ७०० विद्यार्थ्यांचा ‘आत्मनिर्भर’ उपक्रम

दिवाळी निधी संकलन योजनेतील निधी समर्पण सोहळा नुकताच झाला. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी १८ लाख रुपये जमा केले असून, संकलित झालेले १८ लाख रुपये समितीकडे सुपुर्द करण्यात आले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जमवले १८ लाख रुपये! विद्यार्थी साहाय्यक समितीच्या ७०० विद्यार्थ्यांचा ‘आत्मनिर्भर’ उपक्रम
प्रातिनिधिक

पुणे : विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य गावागावापर्यंत पोहोचवण्यासह समितीतील विद्यार्थ्यांना समाजात वावरण्यासाठी आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या दिवाळी निधी संकलन योजनेतील निधी समर्पण सोहळा नुकताच झाला. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी १८ लाख रुपये जमा केले असून, संकलित झालेले १८ लाख रुपये समितीकडे सुपुर्द करण्यात आले.

समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त निधी समर्पण कार्यक्रम झाला. समितीचे खजिनदार संजय अमृते, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त तुषार रंजनकर, समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ कार्यकर्ते रत्नाकर मते आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांची अत्यल्प दरात निवास- भोजनाची सोय करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनविणे, हे विद्यार्थी साहाय्यक समितीचे उद्दिष्ट आहे. दिवाळी निधी संकलन योजना हा त्याचाच एक भाग आहे.

समितीतील विद्यार्थी दिवाळीच्या सुटीत घरी जातात तेव्हा निधी संकलनासाठी १०० रुपयांच्या वीस पावत्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. समितीसाठी निधी जमवण्यासह समितीची माहिती, तिचे कार्य विद्यार्थ्यांनी नीट समजून घेऊन त्यांच्या गावातील, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश असतो. हे दोन्ही हेतू साध्य करत यंदा समितीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७०० विद्यार्थ्यांनी सुमारे १८ लाखांचा निधी संकलित केला. विद्यार्थ्यांना संवादी करणे, समितीच्या कार्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या विचारातून गेली ३० वर्षे निधी संकलन योजना सुरू आहे. यंदा सर्वाधिक १८ लाख रुपयांचा निधी जमा झाल्याचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 17:57 IST

संबंधित बातम्या