scorecardresearch

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

विद्यापीठाला स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर तुकडीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन वर्षे साधारण ३५ विद्यार्थ्यांना एनसीसीला प्रवेश घेता येणार आहे.

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासह राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण घेता येणार आहे. विद्यापीठाला शंभर विद्यार्थ्यांच्या एनसीसी तुकडीला मान्यता मिळाली असून, या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना चार क्रेडिट श्रेयांक मिळतील.

विद्यापीठाला स्वयंअर्थसाहाय्यित तत्त्वावर तुकडीला मान्यता देण्यात आली. पुढील तीन वर्षे साधारण ३५ विद्यार्थ्यांना एनसीसीला प्रवेश घेता येणार आहे. यामध्ये ३३ टक्के मुलींचा समावेश असेल. महाराष्ट्र एनसीसीचे संचालनालयांतर्गत सहा गटांतील एक मुख्यालय पुण्यात आहे. त्यामुळे या युनिटअंतर्गत विद्यापीठातील तुकडीला मान्यता देण्यात आली. या तुकडीचा सर्व खर्च विद्यापीठालाच करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठाकडून एनसीसी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ब आणि क प्रमाणपत्र दिले जाते, राष्ट्रीय निवासी शिबिरासाठीही निवड होते.

हेही वाचा : प्रादेशिक पक्ष संपविण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डाव ; शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे काय, शस्त्र प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, आपत्ती व्यवस्थापन, जीवनावश्यक कौशल्ये, वेळेचे व्यवस्थापन, नेतृत्वगुण विकास, सामाजिक जागरूकता आणि सामुदायिक विकास, पर्यावरणीय जागरूकता, साहसी कृत्ये आदी १२ विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना तीन वर्षात दिले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

हेही वाचा : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुकसानीबाबत पीडब्ल्यूडीकडून केली जातेय टोलवाटोलवी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकुलात एनसीसीचे प्रशिक्षण केंद्र नसल्याची खंत होती. त्यामुळे प्र-कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर एनसीसीचे केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न केले. या केंद्राला मान्यता मिळाल्याने आता विद्यापीठात केंद्र सुरू होईल. या केंद्राद्वारे पदवीस्तरावरील विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. – डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या