पुणे : राज्यभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात प्रत्येकाच्या घरी आणि मंडळांमध्ये गणरायाचे आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या गणरायासाठी अनेकांनी सजावट किंवा देखावे देखील साकारले आहेत. तर सिने अभिनेते सुबोध भावे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून त्यांनी यंदाच्या वर्षी पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारण्याची गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांच्यामध्ये स्पर्धा लागते. तो देखावा साकारला आहे.

या देखाव्याबाबत सुबोध भावे यांना विचारले असता म्हणाले, यंदाच्या वर्षी आमच्या घरच्या गणपतीचे आगमन झाले असून दरवर्षी प्रमाणे यंदा देखील देखावा करण्यात आला आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पृथ्वीला तीन प्रदक्षिणा मारण्याची गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी यांच्यामध्ये स्पर्धा लागते. त्यावेळी कार्तिक स्वामी हे पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्यास जातात, पण गणपती बाप्पा हे आई आणि वडीलांभोवती प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी गणपती बाप्पा सांगतात की, माझ्यासाठी आई आणि वडील हेच जग आहे. त्यातून गणपती बाप्पांनी केवढी मोठी शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. जे आपले जन्मदाते आहेत. आपल्यावर त्यांनी संस्कार केले आहेत. आपल्याला त्यांनी घडवलं आहे. त्यामुळे त्यांचा सांभाळ करणं म्हणजे पृथ्वीचा सांभाळ करणं असं आहे. त्यामुळे एक छोट्याशा गोष्टीमधून बाप्पांनी आपल्याला खूप काही शिकवलं असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. त्याबाबत आपल्याला संदेश द्यायचा आहे का? त्या प्रश्नावर ते म्हणाले, त्याबाबत माझ्याकडे आकडेवारी नाही. तसेच अनेक लोक आपल्या आई वडिलांचा सांभाळ करीत नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येकाच्या घरात मतभेद असतात, हाताची पाच बोटं कुठे सारखी आहेत. प्रत्येकाचे विचार, मत वेगवेगळे असतात. त्यामुळे आपल्या जन्मदात्या, आपल्या आई आणि वडीलांचा सांभाळ करणं ही कुठल्याही मुलाची आणि मुलीची जबाबदारी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी काही मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीवरून मतभेद दिसून आले. त्या प्रश्नावर ते म्हणाले, नेमका मुद्दा काय होता. त्याबाबत मला काही माहिती नाही. त्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही. पण गणेशोत्सवाची मिरवणुक लवकर संपली पाहिजे, दुसर्‍या दिवशी अमावस्या सुरू होते आणि त्या दिवशी गणपतीचे विसर्जन करणे चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जो विसर्जनचा वेळ आहे. त्याच दिवशी विसर्जन झाले पाहिजे, मी या मताचा असल्याचे त्यांनी सांगितले.