ज्ञानप्रबोधिनी प्रशालेची पाचवीची प्रवेश प्रक्रिया यावर्षीही प्रवेश परीक्षेच्या माध्यमातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशालेला दिलासा दिला आहे.
ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र, शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश परीक्षा घेण्यास मज्जाव असल्याने प्रशालेकडून शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याची तक्रार स्वयंसेवी संस्थेकडून गेल्यावर्षी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रशालेची २०१३ -१४ ची प्रवेश प्रक्रियाही अवैध ठरवली होती. याबाबत ज्ञानप्रबोधिनीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये न्यायालयाने २०१३ -१४ चे प्रवेश नियमित केले होते. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षांची म्हणजे २०१४ -१५ ची प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार करण्याचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर ज्ञानप्रबोधिनीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ही विशेष क्षमता असलेल्या मुलांसाठी आहे. ज्या प्रमाणे केंद्रस्तरावर नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा, प्रतिभा विकास विद्यालये काम करतात त्याच धर्तीवर ज्ञानप्रबोधिनी प्रशाला काम करते. यापूर्वी दिल्ली येथील प्रतिभा विकास विद्यालयामध्ये सहावीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेची आणि महाराष्ट्र शासनाची विद्यानिकेतनेही प्रवेश परीक्षा घेतात. त्यामुळे या शाळांप्रमाणेच ज्ञानप्रबोधिनीलाही प्रवेश परीक्षा घेण्यास परवानगी मिळावी, अशी विनंती प्रशालेकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली, असे ज्ञानप्रबोधिनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या पाश्र्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अंतरीम स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये (२०१४-१५) प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया करण्यासही मंजुरी दिली आहे. याबाबत ३ मार्चला न्यायमूर्ती दत्त व न्यायमूर्ती बोबडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.