पुणे : ‘सत्तर-नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी खटाटोप करणारे हिंजवडीसंदर्भात अनास्था का दाखवित आहेत,’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री म्हणून दर आठवड्याला बैठक घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशा बैठका सुरू केल्या तर चांगले होईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वारजे येथील कामाची पाहणी सुप्रिया सुळे यांनी बुधवारी केली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या कायम असून त्यासंदर्भातील मुद्दा सातत्याने उपस्थित होत आहे. आयटी पार्क पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. रस्त्यांची दुरवस्था, पावसामुळे निर्माण होणारा वाॅटर पार्क, वीजेचा लपंडावामुळे हिंजवडी आयटी पार्कबाबत सातत्याने नाराजी व्यक्त होत आहे. यासंदर्भात सुळे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सरकारवर टीका केली.
‘हिंजवडी येथील विविध नागरी समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मागितली आहे. राजीव गांधी आयटी पार्कमध्ये लाखो लोक येतात. हिंजवडीचा विषय हा राजकीय नाही. मात्र सत्तर ते नव्वद हजार कोटींच्या रस्त्यांसाठी सरकार एवढा खटाटोप करत आहेत. मात्र हिंजवडीबाबत अनास्था का दाखविली जात आहे,’ अशी विचारणा सुळे यांनी केली.
वारजे परिसरातील महामार्गाच्या कामबाबतही सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘या कामासाठी महापालिका सहकार्य करत नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. या कामाचा आढावा दर दोन ते अडीच महिन्यांनी घेतला जात आहे. त्यासाठी वाॅर रूम तयार केली आहे. भूसंपादनाअभावी कामाला विलंब होत आहे. जलसंपदा विभागाच्या काही जागा त्यासाठी घ्याव्या लागणार आहेत. राज्य सरकारने भूसंपदान करायचे ठरविले तर ते अवघड नाही. महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठक होत होती. अशी बैठक पुन्हा सुरू झाली तर चांगले होईल,’ असे सुळे यांनी स्पष्ट केले.
आमदारच मारामाऱ्या करत असतील तर कसे होणार ?
आमदार निवासातील उपाहारगृहामध्ये शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी उपाहारगृहातील कर्मचाऱ्याला मारहणा केल्याची घटना घडली आहे. त्याबाबतची चित्रफितही समाजमाध्यमातून प्रसारित होत आहे. यासंदर्भातही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पैसा आणि सत्तेचा माज झाला आहे. देश कोणाच्याही मर्जीने चालत नाहीत आणि चालणारही नाही. आमदारच मारामाऱ्या करत असतील तर कसे होणार,’ असे सुळे यांनी सांगितले.