पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला २०३२ मध्ये ५० वर्षे पूर्ण होणार असल्याने शहराच्या भविष्यातील सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासासाठी ‘पीसीएमसी@५०’ शहर नियोजन धोरण राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका शहरातील २० हजार नागरिकांची मते जाणून घेणार आहे. महिला बचत गटाच्या महिला नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची शहर नियोजनबाबतची मते जाणून घेणार असून, त्याबाबतचा अर्ज भरून घेणार आहेत.

‘पीसीएमसी@५०’ शहर नियोजन उपक्रमांतर्गत शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करून सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात महिला बचत गटांमार्फत शहरातील फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, नोकरदार वर्ग, झोपडपट्ट्यांतील कुटुंबे, गृहसंकुलातील रहिवासी, सामाजिक संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि शैक्षणिक संस्थांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारे हे सर्वेक्षण तीन आठवड्यांत पूर्ण होणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये महापालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये हा सर्वेक्षण उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी जानेवारी ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे एक हजार ५०० हितधारकांच्या सहभागासह, फोकस गट चर्चा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यातून महत्त्वपूर्ण सूचनांची नोंद या उपक्रमांमध्ये घेण्यात आली आहे. ‘पीसीएमसी@५०’ या शहर नियोजन उपक्रमाअंतर्गत शहरी वाहतूक, पर्यावरण, तंत्रज्ञान, प्रशासन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

महिला बचत गटांना प्रशिक्षण

टाटा स्ट्राइव्ह व महापालिकेच्या शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वेक्षण करणाऱ्या बचत गटांच्या महिलांना सर्वेक्षकांचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे उपायुक्त अण्णा बोदडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड शहराचे भविष्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने ‘पीसीएमसी@५०’ उपक्रमांतर्गत शहराच्या विविध घटकांमधील नागरिकांचे प्रातिनिधिक स्वरूपात सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी शहरातील बचत गटांच्या २५० महिलांना सर्वेक्षणांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यातील शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी सर्वेक्षणावेळी महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे. – विठ्ठल जोशी, उपायुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका