केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकरांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “उद्धव ठाकरेंचा…”

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

यावेळी बोलताना, एकनाथ शिंदे कधी कधी आरशासमोर उभं राहून बोलतात, असं वाटतं. कारण ज्या एकनाथ शिंदेंना शिवसेनेचे मंत्री असताना अधिकार होते, त्या एकनाथ शिंदेंना आता मुख्यमंत्री असूनही फडणवीसांच्या परवानगीशिवाय एकही निर्णय घेता येत नाही. अजून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रीमंडळ विस्तार करता आला नाही, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

हेही वाचा – “धनुष्यबाण चोरणाऱ्यांना सांगतोय, हिंमत असेल तर…” मातोश्रीबाहेरून उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान

“एकनाथ शिंदेंनीच धनुष्यबाण भाजपाकडे गहाण ठेवला”

पुढे बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. “एकनाथ शिंदे जर खरंच महाराष्ट्र, शिवसेना आणि धनुष्यबाण यांची गौरव, गरिमा आणि अस्मिता शाबूत ठेवण्यासाठी काम करत असतील, तर कोश्यारींच्या राजीनाम्यापूर्वी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती. पण ते त्यावर चकार शब्द बोलले नाहीत. बेळगाव प्रश्नावरही ते जोपर्यंत केंद्र सरकार इशारा करत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे चकार शब्द बोलले नाही. बोम्मईच्या आक्रमकपणाला विरोध करण्याची हिंमत एकनाथ शिंदे यांनी दाखवली नाही. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण भाजपाकडे गहाण ठेवला आहे”, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – ‘निवडणूक आयोगाने गंभीर चूक केली,’ कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांचे मोठे विधान; म्हणाले, “हा निर्णय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?

शुक्रवारी माध्यमांशी बोलताना, हा विजय बहुमताचा विजय आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. २०१९ साली बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवला होता, तो आम्ही सोडवला, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण करावं, असा सल्लाही त्यांनी दिला होता.