पुणे : पश्चिम घाटातील जैववैविध्याने समृद्ध ताम्हिणी वन्यजीव अभयारण्यामध्ये शाश्वत पर्यटनाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या उद्देशातून मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वन विभागाला आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे. तर, ‘सेंटर फाॅर यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज्’ (सीवायडीए) संस्थेच्या वतीने अंमलबजावणी आणि वन विभागाबरोबर समन्वयाची जबाबदारी सांभाळण्यात येणार आहे.

ताम्हिणी अभयारण्यामध्ये संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाच्या उद्देशाने वन विभागातर्फे ‘बायोडायव्हर्सिटी अँड ईको-प्रोटेक्शन इन प्लस व्हॅली, ताम्हिणी’ हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ताम्हिणी अभयारण्यातील प्रामुख्याने प्लस व्हॅली परिसरामध्ये पहिल्या टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पुणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आणि सेंटर फॉर यूथ डेव्हलपमेंट (सीवायडीए) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, संस्थेचे कार्यकारी संचालक प्रवीण जाधव, इंडिया अँड कूलचे श्रीचंदना नागोजीही यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि सीवायडीए संस्थेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.

‘लोकसहभागातून वन संरक्षण आणि संवर्धन या संकल्पनेनुसार ताम्हिणी अभयारण्यातील प्लस व्हॅली वन क्षेत्रात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तेथील जैववैविध्याचे संरक्षण हा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत ताम्हिणीमध्ये अनेक पर्यावरणस्नेही कामेही होणार आहेत,’ असे चव्हाण यांनी सांगितले.

प्रकल्पांतर्गत प्रस्तावित कामे

– सौर दिवे आणि पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा

– संरक्षक दरवाजे आणि पर्यावरणीय मार्गदर्शक फलक

– प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी कचरापेट्या, बाटली क्रशर

– पाणीसाठवण आणि संरक्षणासाठी बंधारे, गॅबियन संरचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– वन्यजीवांसाठी पाणवठे आणि पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह सुविधा