Kesari Wada Ganesh Visarjan 2025 पुणे : मोबाइल आणि संगणकाच्या काळात सध्या कोणतीही माहिती कोणत्याही क्षणी कुणालाही पाठवणे सहज शक्य होते. त्यासाठी ना कोणत्या शिक्क्याची गरज लागते, ना कोणत्या पोस्टाची. एक ई-मेलसुद्धा पुरेसा असतो. त्याही पुढे जाऊन व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ‘स्टोरी’ टाकून सहज व्यक्त होणाऱ्या पिढीला ‘पोस्टमन’ची ओळख करून द्यावी लागते. डिजिटल दुनियेत हरवलेला पोस्टमन पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतो, तेव्हा नातेवाइक, मित्र-मैत्रिणी आणि घरून येणाऱ्या ख्यालीखुशालीच्या, मदतीच्या पत्राने पाणावलेल्या डोळ्यांसमोर तो जुन्या आठवणींचा काळ पुन्हा उभा राहतो.

तीन पिढ्यांपासून पुण्याच्या मानाचे गणपती आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणारे कार्यकर्ते मिरवणुकीच्या वेळा आणि नियोजनाची कसरत विसरून त्या आठवणींत रमतात. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत स्वराज्य पथकाने केलेल्या सादरीकरणाने असेच अनेक आठवणींचे कप्पे उघडून यंदा देखाव्यातून पोस्टमनची आठवण करून दिली. वादकांनी पोस्टमनची वेशभूषा करून वादन केले.

सकाळपासून गणेश भक्तांच्या उत्साहाने विसर्जन मिरवणुकीतला आनंद द्विगुणित झाला होता. बेलबाग चौकात एकामागून एक येणारे मानाचे गणपती आणि त्यांच्यासमोर होणारे विविध पथकांचे वादन गर्दीला खिळवून ठेवण्याचे काम करत होते. मात्र, केसरीवाडा गणपतीसमोर स्वराज्य पथकाने साकारलेला पोस्टमन सर्व काही विसरून अंतर्मुख करायला भाग पाडत होता. पूर्वी प्रत्येकाच्या घरातील महत्त्वाचे संदेश, माहिती आणि मनी ऑर्डरद्वारे अगदी पैसेही पोहोचवण्याचे काम हा पोस्टमन करायचा. काळ बदलला, त्याबरोबर माहितीची गरज आणि संदेशाचा वेग कमी झाला. या बदलांना स्वीकारून घेत कसलीही तक्रार न करता पोस्टमन आपले काम करत होता. मात्र, समाजमनाने त्याची दखल घेतली का, हा प्रश्न तसा मागेच राहिला. इकडे पोस्टात टाकलेली कोणतेही पत्र व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी पोस्टमनने सोडली नाही. तो काम करतोच आहे.

पोस्टमनची आठवण काढत केसरीवाडा गणपतीसमोर लोकमान्यांचा विचार पुढे जात असल्याचे समाधानही कित्येकांना होत होते. बदलत्या काळात पोस्टमन आणि त्याच्या भूमिकेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. माहिती एका क्षणात पोहोचत असली, तरीही माणसा-माणसातला दुरावा कमी करण्यासाठी एक पोस्टमन हवा आहे. आपुलकीने चौकशी करून अधिकची माहिती देणारा आपला माणूस हवा आहे. त्यासाठी गरज आहे ती पोस्टमनची आठवण जपण्याची. त्याच्या कामाची दखल घेण्यासाठीचा मोठेपणा आपल्यात नसला, तरीही येणाऱ्या पिढीला संवाद आणि साधनांचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी पोस्टमची ओळख आपल्याला जपावीच लागेल.