खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे उपचार घेत असलेल्या आणि ज्यांना कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्याची वेळ आली आहे अशा रुग्णांचा खर्च शासन करणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले असले तरी केवळ गरीब रुग्णांचाच खर्च शासन करणार की सर्वच रुग्णांना याचा लाभ मिळणार या निकषांबाबत मात्र अस्पष्टता आहे.
२ मार्च व त्यानंतर राज्यातील खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा खर्च शासन करणार असून त्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेतील (सीजीएचएस) दरांनुसार खर्च दिला जाईल, असे आरोग्य विभागातर्फे रविवारी सांगण्यात आले होते. मात्र याचा लाभ नेमका कोणत्या रुग्णांना मिळणार याबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही. आरोग्य सहसंचालक डॉ. कांचन जगताप म्हणाल्या, ‘‘व्हेंटिलेटरवरील रुग्णांना सीजीएचएस दरानुसार खर्च देण्याबद्दलचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला असून त्याला मान्यता येणे बाकी आहे. याचा फायदा मिळण्यासाठी रुग्णाच्या आर्थिक स्थितीबद्दलचे निकष काय असावेत यावर निर्णय झालेला नाही.’’
स्वाईन फ्लूमुळे पुण्यात पाचजणांचा मृत्यू
स्वाईन फ्लूमुळे पुण्यात दोन दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत पुण्यात स्वाईन फ्लूमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ४७ झाली असून यातील २६ रुग्ण पुण्यात राहणारे होते, तर २१ रुग्ण पुण्याबाहेरून उपचारांसाठी शहरात आले होते.
पर्वती भागात राहणारे वसंत दत्तात्रेय जोशी (वय ७६) यांचा सोमवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. ४ मार्च रोजी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा त्रास होता. स्वाईन फ्लूसह विषाणूजन्य न्यूमोनिया आणि गंभीर जंतुसंसर्गामुळे अवयव निकामी होणे यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्यांच्या उपचारांना दोन दिवसांचा उशीर झाला होता.
आंबेगाव येथे राहणाऱ्या शीतल चंद्रकांत भावसार (वय ३४) यांचा मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. २४ फेब्रुवारीला त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निदान करण्यात आले होते. त्यांच्या उपचारांना तीन दिवसांचा उशीर झाला होता. कोथरूडचे रहिवासी संजय शशिकांत पुरंदरे (वय ४९) यांचाही मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. १६ फेब्रुवारीला त्यांना स्वाईन फ्लूचे निदान करण्यात आले होते. त्यांच्या उपचारांना सहा दिवसांचा उशीर झाला होता.
पुरंदर तालुक्यात राहणारे सूर्यकांत हनुमान बोरावके (वय ४८) यांचा मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. ७ मार्चला त्यांना स्वाईन फ्लूचे निदान करण्यात आले होते. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्याही उपचारांना चार दिवसांचा उशीर झाला होता. हडपसरच्या नलिनी आनंदराव चव्हाण (वय ५०) यांचा सोमवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. मृत्यूपश्चात त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान करण्यात आले. स्वाईन फ्लूसह त्यांना न्यूमोनिया व एक प्रकारचा रक्तक्षय होता. त्यांच्या उपचारांना चार दिवसांचा उशीर झाल्याची माहिती पालिकेने दिली.
मंगळवारी (१० मार्च) शहरात स्वाईन फ्लूचे २६ नवीन रुग्ण आढळले. सध्या स्वाईन फ्लूचे ८५ रुग्ण रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यातील २४ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. आणखी २७ संशयित स्वाईन फ्लू रुग्णही रुग्णालयात दाखल आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे एकूण ५८६ रुग्ण सापडले असून त्यातील ४५५ रुग्ण उपचारांती पूर्णत: बरे झाले आहेत.