लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: जिल्हा परिषदेत विविध खात्यांतील ८८९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा स्वतंत्र संस्थेतर्फे घेतली जाणार आहे. प्रश्नपत्रिका फुटणार नाही आणि पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

गेल्या काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया रखडली आहे. आता या भरतीसाठी इंडियन बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थेशी करार करण्यात आला आहे. मात्र, या संस्थेने यापूर्वी घेतलेल्या प्रश्नपत्रिकेवर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. त्यामुळे आयुष प्रसाद यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भरती प्रक्रियेबाबतची भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा- तेल, वायूचे साठे शोधण्यासाठी स्वदेशी प्रणाली

जिल्हा परिषदेत ३४ विभागांतील कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. या भरतीच्या ऑनलाइन परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका योग्य पद्धतीने, त्या पदासाठी पूरक असणे क्रमप्राप्त आहे. भरतीसाठीची प्रश्नपत्रिका आयबीपीएस या संस्थेकडून तयार केली जाईल. मात्र त्यासाठी त्यांना अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. त्यानुसारच प्रश्नपत्रिका तयार होतील. तसेच, परीक्षेच्या पाच मिनिटांपूर्वी प्रश्नत्रिका संबंधित केंद्रावर पोहोचणार असल्याने प्रश्नपत्रिका फुटणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

५७ शाळांचे माहिती भरण्याकडे दुर्लक्ष

जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व सीबीएसईशी संलग्न शाळांना त्यांची सर्व माहिती संकेतस्थळावर भरण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र अद्यापही ५७ शाळांनी ही माहिती भरलेली नाही. त्यामुळे या शाळांना नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांनी तातडीने माहिती भरावी लागेल, असेही आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Syllabus from zilla parishad for recruitment process pune print news ccp 14 mrj
First published on: 28-04-2023 at 12:22 IST