पिंपरी : बेकायदेशीरपणे बाळगलेले पिस्तूल बघताना अचानक ट्रिगर दाबला जाऊन गोळीबार झाल्याची घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिंढेवाडी गावात घडली. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. पोलीस हवालदार शंकर पाटील यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईलवर बोलत घरी जात असताना त्यांच्याकडे असलेले बेकायदेशीर पिस्तूल पाहत होते. ट्रिगरमध्ये बोट घालून पिस्तूल गोल फिरवत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि यामध्ये गोळीबार झाला. या घटनेत एकाच्या हाताला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.
आकुर्डीमध्ये श्वानाला अमानुषपणे मारहाण
आकुर्डी परिसरात शनिवारी (१३ सप्टेंबर) पहाटे एका श्वानाला क्रूरपणे मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या श्वानाला मारणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे.
श्वानाचा सांभाळ करणाऱ्या राहुल सदाशिव मार्कर (वय ३४, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मार्कर हे ‘सिम्बा’ नावाच्या तीन वर्षांच्या नर सायबेरियन हस्कीचा सांभाळ करत होते. शनिवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सिम्बाला दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून मारले. त्यानंतर त्याने मृतदेह कचरापेटीत फेकून दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, श्वान खूप प्रेमळ होते. ते आरोपीच्या दिशेने फक्त शेपूट हलवत आणि वास घेत होता. आरोपीने त्याला बेदम मारहाण करून ठार केले.
समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित
याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. श्वान सुरुवातीला आरोपीसोबत खेळताना दिसत आहे. सुरुवातीला आरोपीही त्याच्यासोबत खेळताना दिसतो. मात्र, काही वेळाने तो श्वानाला दगडाने मारतो आणि नंतर लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण सुरू ठेवतो, ज्यामुळे श्वानाचा जागीच मृत्यू होतो. श्वानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह ओढून कचरापेटीत फेकून देण्यात येतो. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ करत आहेत.