पुणे : पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्याचा भाग असलेल्या ताम्हिणी येथे यंदाच्या मोसमात जोरदार पाऊस पडला आहे. ताम्हिणी येथे पावसाने आतापर्यंत ५ हजार मिलीमीटरचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे यंदाच्या मोसमात ताम्हिणीमध्ये किती पाऊस नोंदवला जातो, हे पहावे लागणार आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे उत्तर छत्तीसगड आणि त्याच्या आसपास त्याचा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टी तसेच घाट परिसरात पाऊस आणखी तीन दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण, घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
मात्र सोमवारपासून राज्यातील पाऊस कमी होत असून पाच दिवसाचा खंड पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही काळात ताम्हिणीमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद होत आहे. यंदा जूनमध्ये चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस ताम्हिणीतच पडला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार शनिवारी सकाळपर्यंत ताम्हीणी येथे ५ हजार १४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी ताम्हिणीत सुमारे दहा हजार मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत शहर आणि जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. जिल्ह्यात ताम्हिणी येथे सर्वाधिक २५० मिलीमीटर, त्या खालोखाल कुरवंडे येथे सर्वाधीक १७५, भोर येथे ४१, निमगिरी येथे ८५.५, गिरीवन येथे ५५.५, चिंचवड येथे ३५, तळेगाव येथे ३३.५, तर शिवाजीनगर येथे १३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.