पुणे : वाघोली परिसरातून लॅपटाॅप चोरणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्याला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो पळाला. पळताना ठेच लागून पडल्याने तो पोलिसांच्या हाती लागला. चोरट्याच्या पिशवीतून दोन लाख रुपयाचे चार लॅपटाॅप जप्त करण्यात आले.
सागर नागराज (वय ३१, रा. महादनुर, ता. अंबुर, जि. वेल्लुर, तामिळनाडु) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. वाघोली परिसरातील एका वसतिगगृहातून नागराज याने पाच लॅपटाॅप लांबविले होते. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात चिंतामणी पार्कजवळ पोलीस गस्त घालत होते. त्या वेळी नागराज तेथे थांबला होता. पोलिसांनी त्याला पाहिले. त्याच्या संशयास्पद हालचाली टिपल्या. पोलिसांना पाहताच तो पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पळताना ठेच लागून नागराज पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा पिशवीत पाच लॅपटाॅप सापडले. चौकशीत त्याने १२ ऑगस्ट रोजी पहाटे वाघोली येथील एका सोसायटीतील सदनिकेतून लॅपटाॅप चोरल्याची कबुली दिली. चोरट्याकडून चार लॅपटाॅप जप्त करण्यात आले.
परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस कर्मचारी सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, शिरगिरे, कुदळे, वीर, पाटील, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, दडस, थोरात ही कामगिरी केली.
पीएमपी प्रवासी महिलेचे दोन लाखांचे दागिने लंपास
पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून दोन लाख २६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना कात्रज बसस्थानकात घडली. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सांगली जिल्ह्यातील कडेगावच्या रहिवासी आहेत. १० ऑगस्ट रोजी त्या पतीसोबत पुण्यात आल्या होत्या. कात्रज पीएमपी स्थानकातून त्या वडगाव मावळकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्या वेळी चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या पिशवीतून दोन लाख ३६ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.