पिंपरी : प्रतिशिर्डी शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराबाहेरील मोकळ्या जागेत जलजीवन योजनेअंतर्गत गावात नळ योजना राबवण्यासाठी ठेवलेल्या एचडीपीई पाइपच्या ढिगार्याला आग लावल्याने ८८ लाख रूपये किमतीचे पाईप जाळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आगीमुळे ग्रामपंचायतीच्या आरोग्य केंद्राची इमारत आणि श्री रोकडोबा मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीचे नुकसान झाले.
नागेश बाळासाहेब घायाळ (वय ३६, रा. हडपसर) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरगावात जलजीवन योजनेअंतर्गत नळ योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी फिर्यादी नागेश यांनी शिरगाव ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ८८ लाख ६२ हजार रुपये किमतीचे पाईप ठेवले होते. अज्ञात आरोपीने या पाईपच्या ढिगार्याला आग लावली. यात सर्व पाईप जळाले. या आगीमुळे ग्रामपंचायतीच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे व श्री रोकडोबा मंगल कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागच्या भिंतीचेही मोठे नुकसान झाले. फौजदार गाडीलकर तपास करीत आहेत.