scorecardresearch

अध्यापन कौशल्य विकासासाठी शिक्षकांना प्रशिक्षण ; एससीईआरटी, आयसर पुणे यांचा संयुक्त उपक्रम

राज्यभरातील ३४३ शिक्षकांचा या प्रशिक्षणात समावेश असून, या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये इनोव्हेशन चॅम्पियन घडवण्याचे उद्दिष्ट आहे.

teacher
संग्रहित छायाचित्र

पुणे : गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यासाठीच्या प्रभावी अध्यापन कौशल्ये विकसनासाठी राज्यातील शिक्षकांना आयराइज उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात येत आहे. राज्यभरातील ३४३ शिक्षकांचा या प्रशिक्षणात समावेश असून, या शिक्षकांच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये इनोव्हेशन चॅम्पियन घडवण्याचे उद्दिष्ट आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) यांच्यातर्फे सहावी ते दहावीच्या गणित आणि विज्ञान शिक्षकांसाठी दहा दिवसांचे अध्यापन प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. आयसर पुणेचे संचालक डॉ. जयंत उदगावकर, यशदाचे संचालक विशाल सोळंकी, आयराइजच्या मुख्य तांत्रिक अधिकारी शांती पिसे, समन्वयक डॉ. सौरभ दुबे, एससीईआरटीचे उपसंचालक विकास गरड, तेजस्विनी आळवेकर, मनीषा साठे आदी या वेळी उपस्थित होते. केंद्र सरकारच्या अखत्यारितील विज्ञान तंत्रज्ञान विभाग, ब्रिटिश कौन्सिल, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री, टाटा टेक्नॉलॉजीज यांच्या सहकार्याने आयसर पुणेतर्फे आयसराइज हा उपक्रम राबवला जात आहे.

प्रशिक्षणाअंतर्गत केवळ पाठय़पुस्तकाच्या मदतीने गणित आणि विज्ञान न शिकवता छोटय़ा छोटय़ा कृतींमधून विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देणे, विद्यार्थ्यांना अधिकाधिक विचारशील करण्यासाठी, त्यांच्यात कुतूहल जागृती, प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्यास सक्षम करणे, नवसंकल्पना रुजवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणातून गणित आणि विज्ञान शिक्षकांचा एक सक्षम गट तयार होऊन त्यांच्या माध्यमातून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

उपक्रम काय?

या प्रशिक्षणाअंतर्गत  क्षमता वाढीतून शिक्षकांचा विकास करणे, पीएच.डी. विद्यार्थ्यांना करिअर आणि उद्योग तयार करण्यासाठी मार्गदर्शन, नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक श्वेतपत्रिका तयार करण्यासाठी विचार नेतृत्व मंच, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील विचारवंतांना एकत्रित आणणे या चार घटकांवर काम केले जाते.

गेल्या वर्षी..

गेल्यावर्षी आयसर पुणे आणि एससीईआरटी यांनी संयुक्त रीत्या ‘मैत्री करू या गणित आणि विज्ञानाशी’ हा उपक्रम राज्यातील गणित आणि विज्ञान शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. आता याच उपक्रमाचा पुढील भाग म्हणून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Teachers to get training for teaching skills development zws

ताज्या बातम्या