पुणे : शालेय विद्यार्थ्यांना इंग्रजीसह विविध परदेशी भाषा शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असताना सातारा जिल्ह्यातील विजयनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी वेगळे ठरले आहेत. या शाळेतील दुसरी ते चौथीच्या मुलांना मोडी लिपीचे धडे दिले जात असून, पाच महिन्यांत ही मुले मोडी लिपीचे लेखन-वाचन करू लागली आहेत.

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग असलेल्या माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर शाळेत सातत्याने अभिनव प्रयोग राबवले जातात, विद्यार्थ्यांना विविध प्रकारची कौशल्ये शिकवली जातात. या शाळेतील मुख्याध्यापक बालाजी जाधव, उपशिक्षक शेशाबा नरळे यांनी दुसरी ते चौथीच्या मुलांना मोडी लिपीचे धडे देण्यास सुरुवात केली. क्रमिक अभ्यासक्रम सांभाळून कौशल्य शिक्षणाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे.

हेही वाचा >>>पुणे : खराडीत भरचौकात लूट; दाम्पत्याकडील आठ लाखांची रोकड दुचाकीस्वारांनी लुबाडली

मोडी लिपी शिकवण्याच्या उपक्रमाविषयी बालाजी जाधव म्हणाले, की गेल्या वर्षी या शाळेतील विद्यार्थ्यांना जपानी भाषा शिकवण्यात आली होती. त्याबाबत बरीच चर्चा झाल्यानंतर जपानच्या शिष्टमंडळाने शाळेला भेट देऊन जपानी भाषा शिकण्यासाठीचे साहित्य भेट दिले होते. त्याचाही वापर करण्यात आला. मोडी अभ्यासक मिळत नसल्याचे वाचनात आले होते. याबाबत अभ्यास केला असता मोडी लिपी १९६०पर्यंत वापरात होती. मात्र छपाईतील अडचणींमुळे तिचा वापर बंद झाल्याचे कळले. इतिहासातील अनेक कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे मोडी लिपीकडे कौशल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहून आधी स्वतः यू ट्यूबच्या साहाय्याने मोडी शिकून घेतली. त्यानंतर तिसरी ते चौथीच्या ३५ विद्यार्थ्यांना मोडी लिपी शिकवण्याचा विचार केला. त्याबाबत पालकांशी चर्चा केली असता पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

हेही वाचा >>>समाविष्ट ३४ गावांतील सोयी सुविधांसाठी १८ लोकप्रतिनिधींची समिती; शासनाची मान्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साधारपणे ऑक्टोबरपासून मोडी लिपी शिकवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रोज दोन-तीन अक्षरे, आकार-ऊकार असे करत लेखन, वाचन सुरू झाले. अडचणी आल्यास तंत्रज्ञानाचीही मदत घेतली. तसेच ऑनलाइन उपलब्ध असलेले जुने दस्तावेज अभ्यासून काळानुरूप लेखनात झालेले बदलही मुलांनी समजून घेतले. त्यामुळे आता मुले मोडी लिपीत व्यवस्थितपणे लिहू-वाचू लागली आहेत. या शिक्षणामुळे मुलांना इतिहास, भाषेविषयी गोडी लागण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.