तापमान वाढल्याने दिवसा चटके

कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

राज्याची हवा पालटली, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तापमानवाढ

आकाश निरभ्र झाल्यामुळे राज्याच्या बहुतांश भागातील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असल्याने दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाडा जाणवत आहे.

कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील कमाल तापमान ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. मराठवाडय़ातील परभणी येथे ४०.१ अंश सेल्सिअस एवढय़ा कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठय़ा प्रमाणावर चढ- उतार सुरू होते. मार्चच्या पहिल्याच आठवडय़ात कमाल तापमानात वाढ झाली आणि नंतर ते घटले. उत्तरेकडून आलेल्या थंड वाऱ्यांनी वातावरणात पुन्हा गारवा निर्माण केला होता. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊ लागली.

मध्य महाराष्ट्रात नगर, मालेगाव, सांगली आदी भागांमध्ये कमाल तापमान ३७ ते ३८ अंशांवर आहे. सोलापुरात ३९.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. मराठवाडय़ाच्या परभणी जिल्ह्य़ात राज्यातील उच्चांकी ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. बीड आणि उस्मानाबादचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे.

कमाल/ किमान तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (कुलाबा) २९.७/२२.५, सांताक्रुझ ३०.८/२०.६, अलिबाग २९.४/१९.७, रत्नागिरी ३१.८/१९.६, पुणे ३६.१/१४.३, नगर ३८.२/१४.६, जळगाव ३६.०/१८.०, कोल्हापूर ३६.५/२०.२, महाबळेश्वर ३१.८/१७.०, मालेगाव ३७.६/१९.८, नाशिक ३२.६/१६.६, सांगली ३७.९/१६.९, सातारा ३६.६/१७.१, सोलापूर ३९.३/२२.४, औरंगाबाद ३५.६/१७.८, परभणी ४०.१/१९.९, नांदेड ३९.५/२०.०, बीड ३८.२/१८.५, अकोला ३८.०/१९.०, अमरावती ३९.४/१९.०, बुलढाणा ३२.६/२०.०,  चंद्रपूर ३९.२/२१.४, गोंदिया ३४.८/१४.५, नागपूर ३९.१/१७.१,  वर्धा ३८.८/२०.१

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Temperature rise in state

ताज्या बातम्या