पुणे : लोणावळ्यातून वर्षभरापूर्वी चोरलेला टेम्पो वाघोली पोलिसांनी शोधून काढला. नगर रस्त्यावरील वाघोली बाजारतळ परिसरात लावलेला टेम्पो पोलिसांनी पाहिला. बऱ्याच दिवसांपासून टेम्पो बाजारतळावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.
सुनील अण्णा कांबळे (वय ४०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वाघोली पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी वाघोली बाजारतळ परिसरात वाहन क्रमांकाची अर्धवट पाटी असलेला टेम्पो पोलीस कर्मचारी प्रदीप मोटे यांनाी पाहिला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज बागल आणि पथकाने बाजरतळ परिसरात तपास सुरू केला. टेम्पोत असलेल्या कांबळे याची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे वाहनाची कागदपत्रे आणि वाहन क्रमांकाबाबत पोलिसांनी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कांबळेला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले.
चौकशीत त्याने टेम्पो लोणावळा परिसरात असलेल्या औढोली गावातील एका घरासमोरून एक वर्षांपूर्वी चोरल्याची माहिती दिली. त्यानंतर वाघोली पोलिसांनी शहानिशा केली. अरोपी कांबळेला अटक करुन टेम्पो जप्त केला. त्याला तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल, प्रदीप मोटे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मनोज भोरडे यांनी ही कामगिरी केली.