भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती उभारणीसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली असून त्याअंतर्गत सात प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. प्रस्तावांची छाननी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डाॅ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयाच्या आवारात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी १४७ कोटींच्या खर्चाला महापालिकेने मान्यता दिली आहे. रुग्णालय आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची उभारणी सार्वजनिक खासगी लोकसहभागातून (पीपीपी) होणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्याला प्रतिसाद मिळाला असून सात प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्याची छाननी महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा: पुणे: देवघरातून चांदीची मूर्ती चोरीला; घरकाम करणारी महिला अटकेत

महापालिकेच्या वतीने यंदापासून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालय सध्या मंगळवार पेठेत सुरू असले तरी नायडू रुग्णालयाच्या साडेबारा एकर जागेत हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. महाविद्यालयासह आवश्यक असणारी इमारत, वसतिगृह आणि हॉस्पिटल पीपीपी तत्त्वावर बांधण्याचे नियोजन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.