पुणे : शहरात गेल्या आठवड्यापासून पावसाने लावलेल्या हजेरीमुळे महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या पावसाळापूर्वीच्या कामांचा फज्जा उडाला आहे. शहरात दररोज पाऊस पडत असल्याने जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने पावसाळी गटारे, नालेसफाई यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी साडेचार कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व निविदा २० ते ५० टक्के कमी दराने आल्या असून, यामुळे कामाचा दर्जा काय राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेने मार्च-एप्रिल महिन्यात पावसाळापूर्वीची कामे करण्याासाठी नालेसफाई, पावसाळी गटारांची स्वच्छता करणे तसेच ड्रेनेज लाईनमधील गाळ काढण्यासाठी निविदा काढल्या होत्या. सुमारे २७ कोटींच्या निविदा यासाठी काढण्यात आल्या होत्या. त्या निविदाही ४० ते ५५ टक्के कमी दराने आल्या होत्या. त्या वेळी देखील महापालिकेच्या पूर्वगणनपत्रकापेक्षा इतक्या कमी दराने निविदा आल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात होती.

शहरातील नाले, ओढे, पावसाळी गटारांची स्वच्छ करण्याची कामे योग्य पद्धतीने झाली असल्याचा दावा ठेकेदाराकडून केला जात असला, तरी गेल्या आठवड्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक भागांतील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने ठेकेदारांनी नाल्यांची आणि पावसाळी गटारांची स्वच्छता कशी केली आहे, हे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पावसाळी गटारांची साफसफाई करण्याची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा पूर्वगणनपत्रकापेक्षा १५ टक्के कमी दराने आली आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील वाघोली येथे नालासफाईची कामे करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा ५० टक्के कमी दराने आली आहे. तर ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नालासफाईची निविदा ५० टक्के कमी दराने आली आहे. तसेच, कोथरूड, बावधन, येरवडा-कळस धानोरी, या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये मलनिस्सारण वाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी निविदा काढल्या आहेत. विशेष म्हणजे या निविदाही महापालिकेने तयार केलेल्या पूर्वगणनपत्रकापेक्षा तब्बल ३० टक्के कमी दराने आल्या आहेत. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या निविदांचे प्रस्ताव मान्यतेसाठी येणार आहेत.