पुणे : गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा निवडणूक शाखेची बैठक घेऊन मतदान केंद्रांचा आढावा घेतला.

शहरात महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) मेट्रो मार्गिका आणि स्थानकांची कामे सुरू आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातून मेट्रो मार्गिका जात असल्याने अनेक मतदान केंद्रांत बदल होणार आहेत. त्यामुळे ही मतदान केंद्रे बदलणार आहेत, याचाही आढावा जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत घेतला.

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगाव शेरी, शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ आणि पुणे कॅन्टोन्मेंट हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांमधील मतदान केंद्रे सुस्थितीत आहेत किंवा कसे, मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याची गरज आहे का, मतदार यादी, मतदान यंत्रे आदींचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आढावा घेतल्यानंतर याबाबतचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेकडे देण्याची सूचना या विधानसभा मतदारसंघांच्या मतदान समन्वय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी सुरू असल्याने लवकरच पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा आहे. मात्र, पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणार असल्याने जिल्हा निवडणूक शाखेचा आढावा घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.