पुणे : दर वर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे उद्दिष्ट आहे.कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवेशावर लक्ष राहणार आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जात होती. त्या अंतर्गत सुमारे एक हजार ७३० महाविद्यालयांंतील सुमारे सव्वा सहा लाख जागांवर साडे चार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता संपूर्ण राज्यभरात केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सूर्यवंशी म्हणाले, ‘अकरावीच्या प्रवेशासाठी ‘https://mahafyjcadmissions.in/’ हे स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया १९ मेपासून सुरू होणार आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे.

प्रमाणित महाविद्यालयांचीच नोंदणी

संकेतस्थळावर अकरावीच्या प्रवेशासाठी उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यात विभागीय शिक्षण उपसंचालक आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या महाविद्यालयांनाच संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश द्यायचा असल्यास महाविद्यालयांना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मान्यता घ्यावी लागणार आहे. मान्यता नसलेल्या किंवा अनधिकृतरीत्या अकरावी-बारावीला प्रवेश देणाऱ्या संस्थांना चाप लागणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी नमूद केले.