पुणे: भविष्याच्या दृष्टीने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानाबरोबरच अर्थशास्त्राचे शास्त्रोक्त ज्ञानही मिळावे, या उद्देशाने सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे आता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील अभियांत्रिकीचे विद्यार्थी अर्थशास्त्राचे औपचारिक धडे गिरवणार आहेत.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आणि प्राज उद्याेगसमूहाचे प्रमुख डॉ. प्रमोद चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा… डॉक्टरची हत्या झाल्यानंतर सरकार जागे होणार का? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल

डॉ. चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम बनविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या शिक्षणासोबतच अर्थशास्त्रासारखे आवश्यक शिक्षण घेता येईल. विद्यार्थ्यांची जडणघडण होत असताना सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही अशा प्रकारे प्रयत्न करीत आहोत.

प्रा. आगाशे म्हणाले की, या कराराद्वारे गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे शिक्षक सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचे शिक्षण देतील. तर, आमचे शिक्षक गोखले संस्थेच्या विद्यार्थांना तंत्रज्ञानविषयक विषय शिकवतील. अभियांत्रिकीच्या विद्यार्थांना अर्थशास्त्र हा विषय ऐच्छिक असेल. विद्यार्थ्यांच्या कलाप्रमाणे हे निर्णय घेण्यात येणार असून यासाठीचा पथदर्शी प्रकल्प जानेवारीपासूनच्या सहामाहीत सुरू होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभियंते उद्योजकतेकडे वळत असताना त्यांना अर्थशास्त्राचे शिक्षण देणे गरजेचे आहे. हीच बाब अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनाही लागू होते. त्यांना देखील एआयएमएल, डेटा सायन्स, आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स याची माहिती या प्रकल्पाद्वारे मिळू शकते. – डॉ. अजित रानडे, कुलगुरू, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था