पुणे : आई-वडिलांशी वाद झाल्याने हिंगाेलीतील १६ वर्षीय मुलीने घर साेडले आणि ती पुण्यात पोहोाचली. एकटी फिरत असताना ती बुधवार पेठ परिसरात आली. एका पोलीस मित्राने प्रसंगावधान दाखवून ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनीही तत्परता दाखवून मुलीला हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर फरासखाना पोलिसांचे पथक मंगळवारी (८ जुलै) गस्त घालत होते. बुधवार पेठेतील श्री दत्त मंदिरासमोर एक मुलगी विमनस्क अवस्थेत फिरत होती. एका पोलीस मित्राने मुलीला पाहिले. मुलगी भेदरलेली होती. पोलीस मित्राने याबाबतची माहिती फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाव घेतली. मुलीची विचारपूस केली. मुलगी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा गावातीाल असल्याची माहिती मिळाली. आई-वडिलांशी किरकोळ वाद झाला होता. राग आल्याने ती पुण्यात निघून आल्याची तिने चौकशीत पोलिसांना सांगितले.

दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी हिंगोली पोलिसांकडे तक्रार दिली होती. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक भस्मे यांनी हिंगोली पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी पुण्यात सापडली असून, ती सुखरुप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर हिंगोली पोलिसांचे पथक पुण्यात पोहाेचले. बुधवारी तिला हिंगोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषीकेश रावले, सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव आदींनी ही कामगिरी केली.