पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून तापमानात घट झाल्यानंतर शुक्रवारी शहर आणि परिसरात पावसाच्या सरीही बरसल्या. काही भागांत जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. जिल्ह्यात राजगुरूनगर येथे ३१.५ मिलिमीटर, तर शहरात हडपसर येथे सर्वाधिक १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.यंदा एप्रिलचा महिनाभर तीव्र उष्मा सहन करावा लागला. कमाल आणि किमान तापमानात वाढ होत राहिल्यामुळे उन्हाच्या झळा सहन कराव्या लागल्या. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.

परिणामी, एप्रिलमध्ये १३ ते १४ दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले. मात्र, ५ मेपासून शहर आणि परिसरात कमाल आणि किमान तापमानात काही प्रमाणात घट झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. तसेच हवामान विभागाने मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही वर्तवली होती. त्यानुसार गेले दोन दिवस वातावरण ढगाळ झाले होते. शुक्रवारी सकाळपासून ऊन आणि मळभ असा खेळ सुरू झाला होता. मात्र, दुपारपासून पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री आठ वाजेपर्यंत हडपसर येथे १७ मिलिमीटर, पाषाण येथे १७, शिवाजीनगर येथे ११.२, कोरेगाव पार्क येथे ६, चिंचवड येथे १.५, मगरपट्टा येथे १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तसेच काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

पुढील काही दिवस ऊन-पावसाचा खेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील काही दिवस ऊन-पावसाचा खेळ कायम राहण्याची शक्यता आहे. १५ मेपर्यंत आकाश ढगाळ राहण्याचा, तसेच दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस, ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.