पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून या रस्त्याची डागडुजी-दुरुस्तीसह तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सविस्तर ट्वीट केले आहे. यापूर्वीही त्यांनी वारंवार यासंदर्भात केंद्र सरकारकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला आहे.

‘ पुणे-सातारा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. हा महामार्ग नागरी भागातून जातो. महामार्गापासून नागरी भागांना जोडणाऱ्या सर्व्हीस रोडची अवस्थाही अनेक ठिकाणी दयनीय आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. म्हणूनच या मार्गावर तातडीने सुरक्षा विषयक उपाययोजना करण्यात याव्यात’, असे सुळे यांनी म्हटले आहे.

अपघातांत आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत –

पुणे- सातारा महामार्गावरील वाहतूक कोंडीचाही मुद्दा त्यांनी आवर्जून मांडला आहे. ‘पुणे- सातारा महामार्गावर विषेशतः वाकड ते चांदणी चौक आणि चांदणी चौक ते नवले पूल या मार्गावर नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. परिणामी नागरीकांचा वेळ वाया जात असून या मार्गावर वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. येथील नवले पूल परिसरात तर सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातांत आतापर्यंत अनेकांना प्राण गमावावे लागले आहेत. हे लक्षात घेता येथे तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सुळे यांनी निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर नागरी भागांतून जाणाऱ्या मार्गालगत पदपथाचीही दुरवस्था झाली असल्याने त्याचाही विचार करावा’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुरवस्थेचा त्रास वाहनचालक तसेच परिसरात राहणाऱ्या नागरीकांना –

दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही सुप्रिया सुळे यांनी पुणे-सातारा महामार्गावरील समस्या गडकरींसमोर मांडल्या होत्या. महामार्गावरील दुरवस्थेचा त्रास वाहनचालक तसेच परिसरात राहणाऱ्या नागरीकांना सहन करावा लागतो आहे. गडकरी यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे.