पुणे : दुरस्तीसाठी दिलेले ४० तोळ्यांचे दागिने सराफाने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात सराफाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सराफ व्यावसायिक सुनील जगदीश वर्मा (वय ४१, रा. वेस्ट कोस्ट सोसयाटी, शिवणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ मार्तंड इंगवले (वय ४१, रा. शुभ कल्याण, नांदेड सिटी) यांनी या संदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोमनाथ इंगवले हे बांधकाम व्यावसायिक आहेत. सराफ व्यावसायिक सुनील वर्मा याची शिवणे परिसरात गणराज ज्वेलर्स सराफी पेढी आहे. इंगवले यांनी वर्माला दहा तोळे सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी दिले होते तसेच आकाश घुले, तुषार नाणेकर यांच्यासह दहा जणांनी सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी दिले होते.
दागिने दुरुस्तीला दिल्यानंतर इंगवले दागिने आणण्यासाठी वर्मा याच्या पेढीत गेले. तेव्हा वर्माच्या पेढीला कुलूप असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही. इंगवले यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या सराफाचा शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक यु. डी. रोकडे यांनी सांगितले.