पुणे: परदेशात वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना आवश्यक असतो. हा परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) एक वर्षाच्या कालावधीसाठी दिला जातो. हा परवाना घेणाऱ्या नागरिकांची संख्या यंदा ४ हजार ९१४ वर पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २० टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आलेली आहे.

यंदा २५ डिसेंबरपर्यंत ४ हजार ९१४ जणांना आंतरराष्ट्रीय वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला. मागील वर्षी ही संख्या ४ हजार ९० होती. त्यात यंदा वाढ दिसून आली आहे. यंदा शिकाऊ वाहन परवाना २ लाख ६३ हजार ५९५ जणांना देण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे ४० हजार घट झाली आहे. याचबरोबर यंदा १ लाख २९ हजार ६९३ जणांना पक्का परवाना देण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे १६ हजारांची घट झाली आहे.

हेही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये बिबट्या! बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस, वनविभागाचे प्रयत्न सुरू

परदेशात गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय परवान्यामुळे संबंधित व्यक्तीला वाहन चालविता येते. कोविड संकटानंतर परदेशात जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पुण्यात परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे प्रमाणही अधिक आहे. या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना घेण्याकडे कल आहे. याचबरोबर संबंधित देशातील परवाना मिळेपर्यंत आंतरराष्ट्रीय परवान्यावर वाहन चालविण्याची मुभा त्यांच्यासाठी सोयीची ठरते. तसेच, पर्यटकही परदेशात गेल्यानंतर स्वत: वाहन चालविण्यास पसंती देतात. हा पर्याय त्यांच्यासाठी स्वस्त ठरतो. त्यामुळे त्यांच्याकडूनही या परवान्याला मागणी असते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशात प्रवास करणाऱ्या नागरिकांना तिथे वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना उपयोगी पडतो. परदेशात जाणाऱ्या नागरिकांना तिथे स्वत: वाहन चालविणे सोयीचे आणि स्वस्त पडते. त्यामुळे या परवान्याला परदेशात जाणारे नागरिक प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी