पुणे : ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक आता हिंदीमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर येणार आहे. ‘घासीराम कोतवाल’ हे नाटकाचे हिंदी नाव असून, अभिनेता संतोष जुवेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे.

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अभिनेता संतोष जुवेकर, किरण यज्ञोपवित, नाटकाच्या निर्मात्या आकांक्षा ओंकार माळी, दिग्दर्शक भालचंद्र कुबल, संगीत दिग्दर्शक मंदार देशपाडे या वेळी उपस्थित होते. एरंडवणे येथील द बॉक्स येथे नाटकाच्या ‘पोस्टर’चे अनावरण करण्यात आले.

पानसे म्हणाले, ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग १६ डिसेंबर १९७२ रोजी झाला. त्याला ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. हे नाटक आजवर सुमारे दहा भारतीय भाषांमधून आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिकदृष्ट्या सादर केले गेले नाही. त्यामुळे हे कालातीत नाटक हिंदी भाषकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.’

‘हिंदीमध्ये येणारे ‘घासीराम कोतवाल’ हे नाटक आकांक्षा माळी यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’च्या वतीने सादर होणार आहे. नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांचे आहे. हिंदी नाटकाची संहिता हिंदीतील प्रसिद्ध लेखक कवी प्रा. वसंत देव यांनी लिहिली आहे. संतोष जुवेकर यांच्यासह ५० कलाकारांचा संच नाटकात काम करणार आहे,’ असे पानसे यांनी स्पष्ट केले.कोटहिंदी, कन्नौजी आणि मैथिली या तीन भाषांच्या मिश्रणातून नाटकाचे लेखन करण्यात आले आहे. वसंत देव यांनी नाटक रूपांतरित केले आहे. प्रदेशाच्या, भाषेच्या सीमेपलीकडे जाणारे हे नाटक आहे. – भालचंद्र कुबल, दिग्दर्शक

जूनमध्ये नाटकाला सुरुवात

‘जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नाटकाचा शुभारंभ होऊन भारतातील महत्त्वाच्या नाट्यमहोत्सवांत व विविध राज्यांमध्ये या नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार आहेत. हिंदीतील रूपांतर आजच्या काळाला अनुसरून असून, सादरीकरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत,’ असे अभिजित पानसे यांनी सांगितले.