पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील प्रवाशांची संख्या पुढील तीन महिन्यांत प्रतिदिवस १५ लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ‘पीएमपी’ प्रशासनाने निश्चित केले आहे. सध्या ‘पीएमपी’तून सुमारे साडेबारा लाख प्रवासी रोजचा प्रवास करतात. या उद्दिष्टपूर्तीसाठी ‘आपली सेवा, आपली जबाबदारी’ या धोरणानुसार ‘पीएमपी’च्या व्यवस्थापक संचालक तथा अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी स्वत: पीएमपीतून प्रवास करून त्रुटी जाणून घेऊन मार्गिकाविस्तार, नवीन मार्गिका आणि अमलात असलेल्या सेवांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ‘जीवनवाहिनी’ असलेल्या ‘पीएमपी’तून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीएच्या) हद्दीमध्ये २०२२-२३ पर्यंत प्रतिदिन साडेदहा लाख प्रवासी प्रवास करीत होते. सध्या हा आकडा साडेबारा लाखांपर्यंत गेला आहे. प्रवाशांना अधिकाधिक सेवा देऊन ‘पीएमपी’ला सक्षम करण्यासाठी उपाययोजनांची काटेकाेर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

‘‘पीएमपी’च्या ताफ्यात नव्याने एक हजार पर्यावरणपूरक बस दाखल करण्यास टप्प्याटप्याने सुरुवात झाली आहे. या बसचे मार्गिकेवरून संचलन सुरू असताना बसथांब्याची ध्वनिक्षेपकाद्वारे पूर्वसूचना देणारी प्रणाली, दिवसा आणि रात्री दूरवरून दिसेल अशा बसच्या दर्शनी भागावर डिजिटल पाट्या, ई तिकीट, ज्येष्ठ आणि महिलांसाठी विशेष सुविधा, मार्गिकांचा विस्तार, नवीन मार्गिका, बसची वेगमर्यादा, प्रवाशांच्या सूचना- तक्रारींचे निराकरण, तातडीची सेवा आदींबाबत नियोजन सुरू केले आहे,’ अशी माहिती पीएमपीच्या संचलन विभागाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिली.

प्रत्येक आगारासाठी पालक अधिकारी

पीएमपीचे एकूण १७ आगार असून, प्रत्येक आगाराच्या ठिकाणी ‘पालक अधिकारी’ म्हणून नेमणूक केली आहे. या पालक अधिकाऱ्यांनी मार्गिकांवरील स्थानके आणि थांब्यांची सुधारणा, फलक आणि संचलनादरम्यान वाहक, चालकांकडून पाळण्यात येणारी शिस्त आदींचे स्वत: बसमधून प्रवास करून पाहणीच्या नोंदी ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.

बुधवारी ‘पीएमपी’ने प्रवास

पीएमपीच्या प्रत्येक आगार प्रमुखांसह व्यवस्थापन विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस पीएमपीतून प्रवास करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. मागील काळातही अनेक संचालक, व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी असा प्रवास केला आहे. मात्र, नवीन परिपत्रकानुसार प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रवासाची नोंद ठेवण्यात येणार असून, उद्दिष्टपूर्तीबाबत सूचना अभिप्रायानुसार कामकाज केल्याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पीएमपी’तून प्रवास करताना प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचना जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. सेवांमध्ये नक्कीच आणखी सुधारणा होतील. येत्या तीन महिन्यात प्रवासी संख्या १५ लाखांपर्यंत झालेली असेल.- दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल