पुणे : किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये प्रति किलोवर गेले आहेत. आठवडाभरात दरात प्रतिकिलो ४० रुपयांनी वाढ झाली आहे. राज्यात यंदा लागवडीत ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. पण, वाढलेले तापमान आणि रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जुलैअखेरपर्यंत दर चढेच राहण्याचा अंदाज आहे.

मागील आठवड्यात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो ४० रुपयांवर होते. शुक्रवारी (७ जून) पुण्यात किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर ८० रुपये किलोंवर गेले आहेत. आठ दिवसांत दरात प्रतिकिलो ४० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या बाजारात नारायणगाव (पुणे), संगमनेर (नगर), कळवण (नाशिक) आणि बारामती, फलटण परिसरातून टोमॅटो बाजारात येत आहे.

हेही वाचा – पुणे : सदाशिव पेठेतील शैक्षणिक संस्थेत आग; वसतिगृह व्यवस्थापकाचा मृत्यू, ४० विद्यार्थिनी बचावल्या

राज्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या काळात सरासरीच्या २५ ते ३० टक्क्यांनी टोमॅटो लागवडी वाढल्या होत्या. पण, तापमानवाढीमुळे टोमॅटोचे पीक अनेक भागात वाया गेले आहे. सरासरी ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापमान गेल्यानंतर झाडांची वाढ खुंटते. पानांचा आकार वाढत नाही, फुले कमी येतात. फळधारणा होण्यापूर्वीच फुले गळून पडतात. फळधारणा कमी होते. टोमॅटोचा आकार वाढत नाही. टोमॅटो लहान राहतात. यंदा टोमॅटोउत्पादक भागात तापमान सरासरी ४२ ते ४५ अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे उत्पादनात सरासरी ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. एकरी सरासरी ४० टनांपर्यंत टोमॅटो निघत होता. यंदा १५ ते २० टन टोमॅटो निघत आहे. त्याचाही दर्जा कमी आहे. अनेक ठिकाणी टोमॅटोच्या लागवडी वाया गेल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रतिकिलो सरासरी ३० ते ४५ रुपये दर मिळतो आहे.

दक्षिणेत तापमानाचा फटका

पावसाळ्याच्या सुरुवातीस दक्षिणेतून म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातून राज्यात टोमॅटोची आवक होते. यंदा वाढलेल्या तापमानामुळे दक्षिणेतील टोमॅटो लागवडीवर लिपकल, टास्पो या विषाणूसह अन्य विषाणू आणि रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे दक्षिणेकडे टोमॅटोचा तुटवडा निर्माण होऊन किमती भडकल्या आहेत. त्यामुळे दक्षिणेकडून देशाच्या अन्य भागांत टोमॅटो विक्रीसाठी जाणे थांबले आहे. चांगला दर मिळत असल्यामुळे गुजरात, मध्य प्रदेशातून बेंगळुरू, हैदराबादला टोमॅटो जात आहे. परिणामी राज्यात टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या दक्षिणेत टोमॅटो महाग झाला आहे. तुलनेने पंजाब, हिमाचल प्रदेशातील टोमॅटो दिल्लीत येत असल्यामुळे दिल्लीत टोमॅटो १५ ते २० रुपये किलोंवर आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण

बाजार समित्यांमधील आवक घटली

मुंबई, पुणे बाजार समितीत राज्यात उत्पादित झालेले टोमॅटो येतात. यंदा उन्हाळा, तापमानवाढ, अवकाळी पाऊस आदींमुळे टोमॅटोच्या लागवडी वाया गेल्या आहेत. बाजार समित्यांमध्ये येणारी आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. टोमॅटो काढणीनंतर २४ तासांत बाजारात आणावा लागतो. त्यामुळे राज्याबाहेरून फारसा माल येत नाही. राज्यातील उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटोची राज्यातच विक्री होते. तो राज्याबाहेर पाठवावा इतके उत्पादन होत नाही. मोसमी पाऊस लगेच सुरू झाल्यास अन्य भाज्यांची आवक वाढून टोमॅटोचे दर आवाक्यात येतील. पुढील किमान पंधरा दिवस दर चढेच राहतील, अशी माहिती पुणे बाजार समितीतील आडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या लागवडीतून काढणीला आलेला टोमॅटो सध्या बाजारात येत आहे. गुढीपाडव्याला झालेल्या लागवडीपासून टोमॅटो काढणीस येण्यास आणखी दहा – पंधरा दिवसांचा काळ जावा लागेल. लागवडीपासून काढणी सुरू होण्यास ६० ते ७० दिवसांचा काळ लागतो. यंदा राज्यातील लागवडीत वाढ झाली होती. पण, वाढलेले तापमान आणि विषाणुजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो उत्पादनात मोठी घट झाली आहे. जुलैअखेरपर्यंत टोमॅटोचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. – वीरेंद्र थोरात, विश्व हॅट् ट्रिक नर्सरी, वीरगाव (ता. अकोले)