the rape of a girl child came to light after nine years in pune | Loksatta

पुण्यात बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षांनंतर झाला उघड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

शाळेत समुपदेशादरम्यान पीडित मुलीने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. पीडिता जेव्हा चार वर्षाची होती तेव्हा तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे.

पुण्यात बालिकेवरील अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षांनंतर झाला उघड; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
प्रातिनिधीक छायाचित्र

बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा प्रकार नऊ वर्षानंतर उघडकीस आला. घराशेजारी राहणाऱ्या एकाने मुलीवर नऊ वर्षांपूर्वी अत्याचार केले होते. शाळेत झालेल्या समुपदेशनात मुलीने अत्याचाराच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा- पुणे: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा ससून रुग्णालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न

या प्रकरणी गणपत पडळ (रा. पांडवनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी तेरा वर्षांची आहे. ती एका शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेत मुलींना चांगल्या आणि वाईट स्पर्शाची माहिती देण्यात आली. तसेच मुलींचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनात मुलीने अत्याचाराच्या घटनेची माहिती दिली. पीडित मुलगी चार वर्षांची होती. त्या वेळी ओळखीतील गणपत पडळने अत्याचार केल्याची माहिती मुलीने समुपदेशनात दिली.

हेही वाचा- VIDEO: अभिनेते विक्रम गोखलेंची प्रकृती खालावली, रुग्णालयाची माहिती

समुदेशन करणाऱ्या संस्थेने या घटनेचे गांभीर्य ओळखले. मुलीच्या आई-वडिलांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर मुस्कान संस्थेमार्फत पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले. मुलीवर अत्याचाराची घटना २०१३ मध्ये घडली होती. नऊ वर्षानंतर मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना उघडकीस आली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 14:35 IST
Next Story
पुणे: बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा ससून रुग्णालयामध्ये आत्महत्येचा प्रयत्न