पुणे : राज्यातील पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना शिष्यवृत्तीची रक्कम नवीन दराने वितरित करण्यात आली. यंदा शिष्यवृत्तीसाठी ४९ कोटी ९४ लाख ५० हजार रुपये आवश्यक असून, राज्य शासनाकडून मिळालेल्या १९ कोटी रुपयांचा निधी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आला. 

राज्यात पाचवीसाठी १६ हजार ६८३, तर आठवीसाठी १६ हजार २५८ विद्यार्थी संचसंख्या आहे. पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी ते आठवी शिक्षण घेणाऱ्या एकूण ५० हजार ४९ विद्यार्थ्यांना, तर आठवीच्या परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या ३२,५१६ विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीला शिष्यवृत्ती दिली जाते. गेल्यावर्षीपर्यंत पाचवीला कमाल एक हजार रुपये, आठवीला दीड हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र, यंदापासून शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून पाचवीला पाच हजार रुपये, आठवीला ७ हजार ५०० रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे यंदापासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. २०२३-२४ मध्ये एकूण ४० कोटी ४० लाख फक्त रुपये शिष्यवृत्तीसाठी मंजूर आहेत. तर  २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी रक्कम ४९ कोटी ९४ लाख ५० हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरुन १९ कोटी ३९ लाख १९ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे सातवी, आठवी आणि दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वाढीव दराने शिष्यवृत्ती पहिल्यांदाच वितरित करण्यात येत असल्याचे योजना विभागाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>शासकीय कंत्राटी भरतीमध्ये आता दिव्यांगांसाठी आरक्षित जागा

बँक खात्याची अचूक माहिती आवश्यक

परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती प्राप्त होत नसल्याने शिष्यवृत्ती वितरणात अडचणी निर्माण होत आहेत. २०२१ पर्यंत शिष्यवृत्तीची रक्कम न मिळालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडे द्यावी, ही माहिती  www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अद्ययावत झाल्यावर संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. तर २०२१ नंतरच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी त्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूकपणे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित विद्यार्थ्यांना नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल. – डॉ. महेश पालकर, संचालक, योजना संचालनालय