पुणे : जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आल्याने जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. या कार्यक्रमात २५ हजारपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार होता. तशी सर्व तयारीदेखील पूर्ण झाली होती. मात्र, ऐनवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याने नागरिकांकडून अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांची अवस्था ‘बोलताही येईना आणि सहनही होईना’ अशी झाल्याने त्यांनी याबाबत मौन बाळगणेच पसंत केले आहे.
विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आणला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी ३ जुलैऐवजी ८ जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे ऐनवेळी ही तारीखही रद्द करत १३ जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा >>>प्रवास यातना! गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण

हेही वाचा >>>पुणे : पतीच्या अंगावर ओतले उकळते पाणी…’हे’ कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तीन-तीनवेळा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून प्रत्येक वेळी जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमात जिल्हाभरातून २५ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थिती लावणार होते. त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाणे, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, टाकण्यात आलेला मंडप आदी तयारी वाया गेली आहे.