डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा ‘स्कूल ऑफ सायबर सिक्युरिट’चा प्रस्ताव 

पुणे : राज्य शासनातर्फे देशातील पहिले सायबर विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची घोषणा तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुण्यातील खासगी संस्थेच्या कार्यक्रमात केली होती. प्रत्यक्षात सायबर विद्यापीठाबाबत शासकीय स्तरावर काहीच हालचाली सुरू नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ सायबर सिक्युरिट’ सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांनी केलेली सायबर विद्यापीठाची घोषणा आणि त्याबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीबाबत आमदार रोहित पवार, चेतन तुपे, बननराव शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. त्याला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे स्कूल ऑफ सायबर सिक्युरिटी सुरू करण्याबाबत तंत्रशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचा अहवाल संचालकांनी २६ ऑगस्ट रोजी सादर केला. या अनुषंगाने डॉ.  बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने प्रस्तावित स्कूल ऑफ सायबर सिक्युरिटीबाबतचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. सद्य:स्थितीत काही मुद्दय़ांची स्पष्टता होत नसल्याने स्वयंस्पष्ट खुलाशासह फेरप्रस्ताव सादर करण्याबाबत संचालकांना कळवण्यात आल्याचे पाटील यांच्या उत्तरात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सायबर विद्यापीठाच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू नसल्याने, सायबर विद्यापीठाची घोषणा हवेतच विरल्याचे चित्र आहे.