पुणे : कोंढवा भागातून आईमाता मंदिरासमोरून गंगाधाम चौकाकडे येणाऱ्या डोंगर उतारावरील रस्त्याचा उतार कमी करण्याच्या कामासाठी ९ कोटी १६ लाख रुपयांची निविदा शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आली. येथे असलेल्या तीव्र उतारामुळे होणाऱ्या अपघातांना या कामामुळे आळा बसणार आहे. असा दावा महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला.

गुलटेकडी, मार्केट यार्डजवळ असलेल्या गंगाधाम चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. आईमाता मंदिरासमोरून गंगाधाम चौकाकडे येणाऱ्या तीव्र डोंगर उतारावरील रस्त्यावर सतत प्राणांतिक अपघात होतात. उतारावरून येताना वाहने अनियंत्रित होतात, असा निष्कर्ष काढून महापालिका प्रशासनाने हा उतार कमी करण्यासाठी हे काम हाती घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी याच रस्त्यावर डंपरने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने तीव्र उतार कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याची निविदाही काढली होती. मात्र, ही निविदा रद्द करण्यात आली होती.

गेल्या महिन्यात या चौकात झालेल्या अपघातामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. महापालिका आयुक्तांसह, पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट देत तातडीने उपाययोजना करण्यात येईल, असे जाहीर केले होते. या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने तातडीने या कामाची निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवली. या कामासाठी तीन निविदा आल्या. त्यापैकी मोहनलाल मथरानी कन्स्ट्रक्शन प्रा.लि.ची २०.०१ टक्के सर्वात कमी दराची असलेली निविदा मान्यतेसाठी ठेवण्यात आली. या निविदेला शुक्रवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जड वाहतूक रोखण्यासाठी लोखंडी हाईट बॅरिअर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंगाधाम चौकात प्रामुख्याने कात्रज कोंढवा रस्त्यावरील कान्हा हॉटेल चौक ते गंगाधाम चौकापर्यंत असलेल्या रस्त्यावर जड वाहतुकीला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही बंदी घातली आहे. या रस्त्यावरून दररोज मिक्सर, डंपर आणि मालवाहतूक करणारी जड वाहने येऊ नये, यासाठी लोखंडी हाईट बॅरिअर्स उभारण्यात आले आहेत. याची कामे सध्या सुरू आहेत.