पुणे : हडपसर भागातील रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या सहा पाण्याच्या टाक्यांची कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे आकाशवाणी, ससाणेनगर, काळे बोराटेनगर, सातववाडी या भागात केवळ एक तास पाणी मिळत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. ही रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत; त्यानंतरच या भागात पाण्याचे मीटर बसवावे, अशी आग्रही मागणीही करण्यात आली आहे.

हडपसर भागातील पाणीप्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी सेल विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेण्यात आली. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष प्रशांत सुरसे, सचिन नेमकर, ऋषिकेश रणदिवे, पल्लवी सुरसे आदी या वेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन सुरसे यांनी हडपसरमधील पाणीप्रश्नाची माहिती दिली. महापालिकेने या भागातील टाक्यांची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

हेही वाचा >>>खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी

सुरसे म्हणाले, ‘हडपसर येथील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने येथील विविध भागांत पाण्याच्या सहा टाक्या बांधल्या आहेत. मात्र, जलवाहिनी न जोडणे, काम अर्धवट ठेवणे यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित ही कामे पूर्ण करून पाणी पुरवठा करावा. हडपसर गावठाण, गाडीतळ हा भाग गेल्या ६० वर्षापासून महापालिकेत आहे. तर सातववाडी, गोंधळेकर, काळे बोराटेनगर हा भाग १९९७ पासून महापालिकेत आहे. पण आजही या भागात पुरेसे पाणी मिळत नाही. स्थानिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

हेही वाचा >>>चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार टाक्या बांधून पूर्ण

हडपसर परिसरातील तुकाईनगर येथे ३५ लाख लिटर, हडपसर बस डेपो येथे ४५ लाख लिटर, भुजबळ स्कीम येथे ३५ लाख लिटर, आकाशवाणी येथे ३५ लाख लिटर क्षमतेच्या दोन आणि साधना विद्यालय येथे ४५ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधली आहे. यातील चार टाक्या बांधून पूर्ण झाल्या आहेत. पण त्यांमध्ये पाणीच येत नसल्याने रहिवाशांना पाणी मिळत नाही. पाणीपुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे वर्षानुवर्षे स्थानिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे सुरसे यांनी सांगितले.