पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जितो कनेक्ट २०२२ या व्यापार विषयक प्रदर्शनात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी प्रदर्शनातील वेगवेगळ्या चार स्टॉलमधून ५ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदर्शनात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे गुन्ह्याचा तपास केला जात आहे.

व्यावसायिक निलेश पारख (वय ४७, रा. चव्हाणनगर, धनकवडी) यांनी या संदर्भात बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अलीकडेच पुण्यातील मार्केट यार्ड- कोंढवा रस्त्यावर ‘जितो कनेक्ट २०२२’ व्यापार विषयक परिषद तसेच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी या प्रदर्शनाची सांगता झाली. प्रदर्शनात अनेक व्यावसायिकांनी स्टॉल लावले होते. चोरट्यांनी फिर्यादी पारख यांच्यासह प्रशांत लुणावत, प्रतीक रांका यांच्या स्टॉलमधील तिजोरीतून रोकड चोरली आहे. योगेश चुत्तर यांचा स्टॉलसह अन्य दोन स्टॉलमधूनही चोरट्यांनी रोकड लांबवली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्यांनी या प्रदर्शनातून एकूण ४ लाख ५५ हजारांची रोकड, हिरेजडीत ब्रेसलेट, दोन मोबाइल संच असा ऐवज लांबवला आहे. पोलिसांकडे तक्रार देण्यात आल्यानंतर प्रदर्शनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग करत आहेत.