मागील दोन दिवसांपासून शहरातील गारठा वाढला असून पुढील काही दिवस शहरात सकाळी काही तास धुके आणि दिवसभर निरभ्र आकाश असेल, अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शनिवारी शहरात १०.३ तर रविवारी १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले.
किमान तापमान सरासरीच्या खाली गेल्याने मधले काही दिवस नाहीशी झालेली थंडीही पुन्हा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. सरासरी तापमान किमानपेक्षा कमी झाल्याने संध्याकाळनंतर पहाटेपर्यंत गारठा, सकाळी धुके आणि दिवसभर उन्हाच्या झळा, असे मिश्र हवामान शहरात अनुभवण्यास मिळत आहे.
हेही वाचा – पुणे : बेकायदा सावकारी करणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा
पुढील काही दिवस तापमानातील ही घट कायम राहील, असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडी परतल्याने रविवारी ( ५ फेब्रुवारी) राज्यातील निचांकी तापमान जळगाव येथे १०.० अंश सल्सिअस इतके नोंदले गेले. नाशिकमध्ये ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. आजपासून (६ फेब्रुवारी) राज्यातील तापमानात पुन्हा चढ-उतार होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.